Friday, April 19, 2024

स्वप्नवत सफर

 



स्वप्नवत सफर 


जैवविविधतेने नटलेल्या सुंदरबनला जाण्यासाठी कोलकत्ता येथून बसने प्रवास करीत सोनारखळीला पोहचलो.तेथून सुंदरबन पाहण्यासाठी बोटीने निघालो होतो.आमच्या फक्त अकरा जणांच्या प्रवासासाठी ही संपूर्ण बोट राखीव ठेवली होती.बोटीत आमचे व खाण्याचे सामान ठेवल्यावर बोटीचा प्रवास सुरु झाला. मस्त वातावरण होते.दोन्ही तटावर वस्ती दिसत होती. 
उजव्या तटाच्या बाजुने बोटीचा प्रवास सुरु होता. 

आमच्या गाईडने सुंदरबन ची माहीती देण्यास सुरुवात केली. 
"सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे परिसंस्था म्हणूनही ओळखले जाते.सुंदरबन हे खारफुटीचे वन गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या तीन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात आहे.खारफुटीच्या एका झाडाचे नाव बंगालीमध्ये सुंदरी असे आहे. त्यामुळे या खारफुटीच्या वनाला ‘सुंदरबन’ असे नाव पडले. याचा बराचसा भाग बांगलादेशात आणि काही भाग भारतात येतो. १४० हजार चौरस हेक्टरवर हे कांदळवन पसरले असून १९८७ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून सुंदरबनाला मान्यता दिली आहे.जलचर, भूचर आणि उभयचर प्राण्यांचे ते माहेरघर आहे.त्याचबरोबर रंगीबेरंगी पक्ष्यांमुळे सुंदरबनचे सौंदर्य आणखी खुलते. विविध प्रजातींची फुलपाखरे, कीटक, मधमाश्यादेखील येथे आढळतात.एक रुबाबदार, देखणा प्राणी रॉयल बेंगॉल टायगर तोही या सुंदरबनात मोठय़ा दिमाखात वावरतो."

मंद वा-यात व शांत वाहणा-या पाण्यातून आमची बोट वाट काढत आम्हाला घेऊन पुढे निघाली होती.बाजुने वेगवेगळ्या आकाराच्या बोटी जा ये करीत होत्या. आमचा गाईड दोन्ही तटांवर दिसणा-या गोष्टीची माहीती देत होता. आम्हीही त्याला काही गोष्टीचा खुलासा करीत प्रवास चालला होता.संध्याकाळ पर्यत हा असा प्रवास करायचा असल्याने आनंद झाला. काही मंडळी फोटो काढण्यात गुंग होती. बोटीतच जेवण लावले गेले.
मोठा नदीच्या प्रवाहातून व दूर दिसणा-या आकाशाखालून चालणा-या बोटीत जेवण करण्याची ही पहिलीच वेळ होती. आजूबाजूचा परिसर  न्याहाळत जेवण कधी संपले ते कळलेच नाही.  

बोट आपल्याच तालात मंद चालीत वाहत होती. काही वेळाने अंधार झाला.पाऊस येण्याअगोदरची परिस्थिती निर्माण झाली आणि जोराच्या वा-यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली. बोटीवर छप्पर पत्र्याचे असल्याने ताशा वाजु लागला.बराच वेळ पाऊस पडल्याने सर्वजण धास्तावले.असाच पाऊस पडला तर मजा करता येणार नाही, अशी नाराजी पसरली. शांत बसून वेगळ्या पावसाचा आनंद घेतला.

पाऊस ओसरल्याने बोटीतल्या तळघरात गेलेली मंडळी वरती आली.नंतर लख प्रकाशात परिसर पावसाने न्हाऊन निघालेला दिसला .सुंदर निसर्ग पाहण्यास मिळाला.दोन्ही तट आता दूरवर दिसत होते. सगळीकडे संथ वाहणारे पाणी दिसत होते.बोटीचे मार्गक्रमण सुरु होते.एका मोठ्या बेटाच्या जेटीला आमची बोट लागली.तेथे सुंदरबन चे वनरक्षकांचे कार्यालय व वस्तीस्थान होते.वनाचे टेहाळणी करण्यास बांधलेल्या बुरुजावर चढून मोठे जंगल पाहिले.दूरवर हरणं चरताना दिसली.कासवं व मगरी पाहील्या.

संध्याकाळी पुन्हा बोटीने प्रवास करीत मानवी वस्ती असलेल्या एका बेटावर उतरलो.आमचे सामान घेऊन आम्ही हॉटेल राहण्यास आलो.नंतर गावात फेरफटका मारला. गरीबी पाहिली. वेगळे राहणीमान पाहण्यास मिळाले.औषधोपाराची कोठे सोय नव्हती. येथे येण्याचे एकच साधन हे बोट होते. रात्री तेथे आमच्यासाठी त्यांची संस्कृती पाहण्यासाठी नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होते.आम्ही सगळयांनी त्या कार्यक्रमात त्यांच्यासह नाचून खूप मजा केली. रात्री शांत वातावरणात कधी झोप लागली ते कळलेच नाही.

पहाटे कोबंड्याच्या आरवण्याने सकाळ झाल्याचे कळले.तयारी करुन आम्ही लवकरच बोटीत बसून प्रवासाला सुरुवात केली. सकाळचे प्रसन्न वातावरण मन भारावून गेले.बोट पश्चिमेला जात होती पूर्वेला सुर्योदयाची
तयारी झालेली दिसली.काय नजारा होता?बोट पाण्यावर तरंगत चाललेली वाटत होती.मोठी मोठी बेटे पाठीमागे टाकीत आमची बोट भरतीचे पाणी कापत पुढे जात होती. बोटीवर चहापाणी झाला.प्राणी बेटाहून बाहेर जावू नयेत यासाठी मोठे कुंपण लावलेले दिसले.झाडे चालताना दिसत होती.मध्येच काही पक्षी उडताना पाहिले तर पाण्यात मासे दिसले.चित्रपटातील गाणी ऐकत व गुणगुणत प्रवास सुरु असल्याने बोटीचा  प्रवास कधीच संपू नये असे वाटत होते.

काही बेटांवर मनुष्य वस्ती आहे.काही बेटावर जंगल व हिंस्त्रप्राणी असल्याने तेथे जाण्यास बंदी आहे. वन रक्षकांची बोट या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी फिरत असते.पाण्याने बेटांचा आकारमान कमी होत चालला आहे. एका बेटावरील प्राणीसंग्रालयाला भेट देण्य़ास बोटीतून उतरलो.तेथे तीन आजारी वाघांना ठेवल्याने आम्हाला पाहता आले. मगरी,हरणं व पक्षी पाहिले.शहाळ्याची पाणी प्यायलो व पुन्हा बोटीत बसलो.पाण्यावर सुर्याची किरण पडल्याने पाणी चमकत होते. बेटावर प्राणी दिसतील म्हणून नजर ठेवून होतो. माकडं व बगळे दिसले. ’सुनाहा सफर’ हे गाण गुणगुणत बाहेरचा नजारा पाहत शांतपणे विहार सुरु होता.आपण स्वप्नात हा प्रवास करत असल्याचा भास होत होता.

इतक्यात बोट चालवणा-याने ते ’सोनारखळी’ आल्याचे सांगितले आणि मी स्वप्नातून जागे झालो.आता आपल्याला बोटीतून उतरावे लागणार असल्याने मी नाराज झालो. सुंदरबन बोट सफारी हे आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे. त्याचा अनुभव घेऊन एका अविस्मरणीय सफारीच्या  आठवणीवर आयुष्य भरभरुन जगावे.       


Saturday, March 16, 2024

धोडपगडाचे रुप भावलं



 


किल्ले ’धोडप’ चा ट्रेक 



ब-याच दिवसापासून धोडप गडावर जाण्याची मोहीम आखत होतो. पण हा किल्ला नेहमीच आम्हाला हुलकावणी देत असल्याने ह्या गडाचा ट्रेक सारखा खुणवत होता.शेवटी एकदाचे ठरले आणि आम्ही जण निघालो.प्रवास लांबचा असल्याने खासगी बसने रात्रीचा प्रवास करुन पायस्थाशी असलेया ’हट्टी’ या गावात पहाटे पोहोचलो.गावात असलेल्या वनविभागाचे 'निसर्ग पर्यटन केंद्रात चहापाणी करून ट्रेकला सुरुवात केली.


महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये दुसरा सर्वात उंच गिरिदुर्ग आहे.सह्याद्रीची पूर्वपश्चिम असलेल्या सातमाळ या डोंगररांगेतील शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप ट्रेकरांना भुरळ घालतो.धोडप गडाचा बालेकिल्ल्याच्या वरील एका बाजूला पिंडीसारखा कातळाचा आकार तयार झालेला आहे. त्यालाच लागून तयार झालेल्या सरळसोट भिंतीमध्ये मोठी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक खाच तयार झालेली आहे. लांबून गडावरील या गोष्टी स्पष्ट दिसत होत्या.या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी चढाईचे आव्हान स्विकारत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करीत चढाईला सुरुवात केली.          



गावाला पाणी पुरवणा-या घरणाच्या पाण्यात पहाटेची सुर्याची किरण पडलेल्या धोडप किल्ल्याचे प्रतिबिंब पाहत पाहत ट्रेकची सुरुवात केली.पहाटेचे वातावरण व निसर्ग प्रसन्न करणारा होते.गडावर जाण्यापूर्वी मारुतीरायांचे दर्शन घेऊन पुढे निघालो.काही अंतर चढून गेल्यावर एक जुनी पाय-यांची बारव (पायविहीर) आहे. या बारवेची बांधणी संपूर्ण दगडात चौकोन आकाराची असून पाण्यात उतरताना खालील कमानीची रचना मंत्रमुग्ध करून टाकते.

सर्व बांधकाम अजून शाबूत आहे,हे विशेष. 


मोठ्या मोठ्या चढणी पार करून दमछाक होत होती.पुढे गेल्यावर एक छोटे तळे ( गणेश टाकं ) आले तिथे एक छोटी गणपतीची मूर्ती होती.परिसर छान व पवित्र वाटल्याने आम्ही गणपतीची आरती करुन आमचा ट्रेक चांगला होऊ दे अशी प्रार्थना केली. या पुढे रास्ता अजून कठीण होत जाणार होता आणि सूर्य ही हळू हळू डोक्यावर येत होता.


ह्या मंदिरांपासून पुढे पंधरा वीस मिनिट सरळ चालत गेल्यावर आपण पूर्वाभिमुख दरवाजाकडे येऊन पोहोचतो. या दरवाज्याच्या बाजूला उध्वस्त तटबंदी व बुरुज आहेत. आतील बाजूस पहारेकार्‍यांसाठी देवड्या आहेत.


 वाट अवघड होऊन बसल्याने त्या ठिकाणी लोखंडी शिडी लावली आहे. आम्ही दोन बुरुजांपांशी पोचलो आणि पुढे दगड कोरून बांधलेला दरवाजा आला. हा दरवाजा म्हणजे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. येथील दगडी खोदीव पायऱ्या बघण्यासारख्या आहेत. दरवाजाच्या परिसरात काही शिलालेख आढळले.  तिथून पुढे कोरीव पायऱ्यांच्या वाटेनं पुढे गेल्यावर गडाचा दुसरा, कातळात कोरलेला दरवाजा लागला. संरक्षणाच्या दृष्टीनं लपवलेल्या प्रवेशद्वाराशेजारी आपल्याला दोन शिलालेख दिसला. दरवाजातून पुढे गेल्यानंतर बालेकिल्ल्यावरील वाड्याचे अवशेष दिसतात. या वाड्याची बरीच पडझड झालेली दिसली. छतही कोसळलं आहे. त्यावरील बारीक नक्षिकाम आपल्याला गडाच्या गतवैभवाची झलक दाखवतं.वाड्याशेजारीच पाण्याची दोन टाकी पाहिली. 


बालेकिल्ल्याच्या डाव्या हाताच्या वाटेनं पुढे गेल्यावर आपल्याला डोंगराच्या पोटात अनेक गुहा कोरलेल्या दिसतात. यातील एका गुहेत भवानीमातेचा तांदळा दिसतो.सर्व गुहा पिंडीच्या आकाराच्या कातळाच्या पायथ्याशी आहेत. त्यामधील सर्वात शेवटची गुहा राहाण्यायोग्य आहे. त्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याच टाकं देखील आहे. गुहेत देवीची मुर्ती बसवलेली आहे. या गुहेपासून सरळ चालत पुढे गेल्यावर धोडप किल्ल्याच्या सुप्रसिध्द कातळात असलेल्या नैसर्गिक खाचेच्या वरच्या बाजूला पोहोचतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. धोडप किल्ल्यावरून पश्चिमेला रवळ्या-जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी हे गड दिसतात. पूर्वेला हंड्या, इखारा हे सुळके आणि कांचना गड दिसले.उत्तरेला कण्हेरगड व साल्हेर पाहायला मिळाले.


किल्ल्याचा विस्तार बर्यापैकी मोठा आहे. तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, राजवाडे, विहिरी अश्या अनेक वास्तूंनी धोडपला सुंदर सजवलं आहे. किल्ल्यावरील बांधकाम बघता हा किल्ला फार प्राचीन आहे ह्याची जाणीव होते. बांधकामातील विविधते वरून हा किल्ला वेगवेगळ्या राजवटीखाली असल्याचे लक्षात येते.



धोडप हा किल्ला एकदम देखणा आणि रांगडा आहे.दुर्ग प्रेमींसाठी आणि हौशी छायाचित्रकारांसाठी हा किल्ला नेहेमीच एक आकर्षण राहिला आहे.सारे अवशेष आणि धोडपचं रांगडं रूप मनात साठवत आम्ही परतीच्या वाटेला लागलो.


निसर्गाने आणि इतिहासाने सुदधा मुक्त हस्ताने उधळण केलेला एक नितान्त सुंदर दुर्ग पाहण्यास मिळाला. 


Wednesday, October 18, 2023

भेटण्याची ओढ

 






   भेटण्याची ओढ


आम्ही ऐशी व नव्वदच्या दशकात  मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या स्पोर्ट्स क्लब तर्फे सह्याद्रीत ट्रेकिंगला जात होतो. वरिष्ठ ट्रेकरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टेकिंग केल्याने आम्हाला शिकायला मिळाले. ट्रेकिंग करता करता आमची घट्ट मैत्री कधी  झाली ते कळलेच नाही. एक मोठा ग्रुप झाला. महिन्यातून  दोनदा कोणत्यातरी गडावर 
भेट व्हायची. आमच्या ग्रुपमधले काहीजण बाहेरच्या ग्रुप बरोबर मोठमोठ्या ट्रेकला जाऊ लागले. आमच्या ग्रुपमध्ये काही नवीन ट्रेकर्स सामिल झाल्याने नवा ग्रुप तयार झाला. जुन्या ग्रुपमधल्या काही ट्रेकर्सची भेट होत नव्हती. ते सर्व ट्रेकर्स मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या सेवेतून सेवानिवृत होऊनही ट्रेकिंग करीत आहेत. जवळजवळ तीस वर्षांनी सर्वांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने भेटण्याची ओढ वाढली होती.  

 १८ जुलै २०२३ ला  संजय नलावडे च्या धोलवड येथील त्याच्या नवीन घरी भेटण्याचे ठरले. श्रीधर दळवी,अजित धोंड,राजन फाटक,शशी नलावडे,हेमंत वरळीकर , सतिश चव्हाण ,हेमंत जोशी आणि मी, आम्ही कल्याणला भेटलो व संजय नलावडे च्या घराच्या दिशेने प्रवास सुरु केला. राजन फाटक याने दोन दिवसाची रजा काढून आम्हाला भेटण्यास आला होता. पूर्वी वाहतुकीची साधने कमी असल्याने नेहमीच आम्ही एसटीने प्रवास करीत 
ट्रेक करायचो. ते दिवस व तो प्रवास वेगळाच असायचा. त्या दिवसांच्या आठवणी करीता आताही एसटीने प्रवास करायचे ठरले होते. पाऊस जोरात  पडत होता तरीही सर्व मंडळी भेटण्याच्या ओढीने आली होती. प्रवासात एकमेकांची विचारपूस झाली व खूप गप्पा झाल्या.  मालशेज घाटातून प्रवास सुरु झाल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या.या परिसरात आम्ही बरेच ट्रेक केले होते.    

ओतुर येथील श्री कपार्दिकेश्वर या शिव मंदीरात जाऊन दर्शन घेऊन आमच्या सहलीची सुरुवात केली. भोजन करुन आम्ही संजय नलावडे च्या ’श्रीहरी’ या बंगल्यात पोहचलो. आमच्या मित्रांनी भव्य वास्तू बांधल्याने आम्हाला त्याचा अभिमान वाटला. बंगला पाहिला. कोणीही विश्रांती न घेता गप्पा केल्या. तब्तेतीमुळे काही मित्र आमच्यात सामिल होऊ न शकल्याने आम्हाला वाईट वाटले. आम्ही आमच्या सर्वांचे फोटी ग्रुप वर शेअर केल्याने त्यांनाही  सहलीची माहिती मिळत गेली. त्यांनाही या भेटीत आपल्याला सहभागी न होता आल्याने खंत वाटली. संध्याकाळी ओझरच्या  ’विघ्नहर’ बाप्पाचे दर्शन घेतले.

जेवल्यानंतर रात्री गप्पांचा फड बसला. अजित धोंड यांनी केलेल्या हिमालयातील ’चदर ट्रेक’ व ’ कैलास परिक्रमा’ या ट्रेकचे फोटो पाहून त्याचे अभिनंदन केले. कोणालाही झोप येत नव्हती. जुन्या ट्रेकमध्ये केलेल्या दंगामस्ती आठवून मजा केली. उद्या 
 छोटासा  ट्रेक करायचे ठरवून आम्ही उशिरा झोपलो.

पहाटे लवकर उठून तयारी करुन आम्ही ’ शिवनेरी’ गडाच्या दिशेने निघालो. पाऊस नुकताच पडून गेल्याने वातावरण प्रसन्न वाटले . हिरवाई ओसंडून वाहत होती.  चढाईला सुरुवात केली. जुने दिवस आठवत होते.  तीस वर्षापूर्वी आम्ही कसे होतो आणि आता कसे आहोत याची जाणीव होत होती. आठवणीसाठी फोटो काढत गडावर पोहोचलो. जिजाऊ मातेच्या स्मारकाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. आम्ही भारावून गेलो.आमचे मन भरल्यानंतर आम्ही गडावरुन खाली उतरलो.

मुंबईत पाऊस जोरात पडत असून रेल्वे बंद असलेल्याच्या बातम्या आल्यावर आम्हाला चिंता वाटू लागली. जून्नर परिसरात पाऊस नसल्याने आम्ही लेण्याद्री येथील लेण्यातील ’गिरिजात्मक’ बाप्पाचे दर्शनाला निघालो. दुपारची वेळ असल्याने पाय-या चढताना दम लागला. गुहेत पोहचल्यावर बाप्पाच्या दर्शनाने थकवा दूर झाला. खाली उतरून भोजन केले व परतीचा प्रवास सुरु केला. संजयच्या पाहुणचाराने आम्ही खूष झालो.

या भेटीने सर्वांना आनंद झाला होता. मैत्री असीच टिकवायची अशी वचने नकळत दिली गेली. प्रवासात पावसाचा कोठेही त्रास झाला नाही. पुढच्या भेटीची आखणी करीत मुंबईत सुखरुप  पोहचलो. आमच्या भेटीचे दोन दिवस कायमचे आमच्या स्मरणात राहतील.


Monday, June 19, 2023

कंठ दाटून येतो

 

२३.०५.२०२३ रोजी हा लेख महाराष्ट्र टाइम्स  या वॄतपत्रास ’पत्रास कारण की’ या सदरात  प्रसिध्द झाला आहे 



विजय मित्रा


परवाच्या राजगडच्या ट्रेकमध्ये तुझी ब-याच वेळा आठवण आल्याने आपल्या सर्व मित्रांच्यावतीने तुला पत्र लिहावेसे वाटले. करोनाच्या काळात तु अचानक आम्हाला सोडून गेलास पण सह्याद्रीतल्या प्रत्येक ट्रेकमध्ये तुझी आठवण येते. आपण एकत्र कामाला होतो पण तुझी आणि माझी ओळख मात्र एका ट्रेकमध्येच झाली. ओळखीपासूनच आपली मैत्री झाली. काय दिवस होते ते. पावसाळ्यात जवळजवळ प्रत्येक शनिवार आणि रविवार आपण सह्याद्रीत असायचो. तु ट्रेकमध्ये सर्वांची काळजी घेत होतास. तु ट्रेकला असल्यावर खाण्याची चंगळ असायची. सुका खाऊ,फळं व जेवण मांसाहारी आणत होतास. सगळे मित्र तुझी चेष्टा करायचे पण तु कधीच चिडला नाहीस. तुला फोटोची आवड असल्याने आमच्याकडून तु तुझे फोटो काढून घेत होतास. ट्रेकला जाण्यापूर्वी त्या गडाची संपूर्ण माहिती शोधून आणल्याने आपण कधी रस्ता चुकलो नाही. गडावर गेल्यावर तेथील ठिकाणाची माहिती तु सर्वांना देत होतास. ट्रेकमध्ये तु महाराष्ट्र गीत व भजन गात होतास. तुझे छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्सीम प्रेम होते. त्यामुळे तुला सह्याद्रीत भटकंती करण्यास आवडत असे. तु तुझ्या मुलांना देखील ट्रेकींगची आवड निर्माण व्हावी म्हणून ट्रेकला घेऊन येत होतास. ट्रेकमध्ये तु कधी आला नाही की चुकल्यासारखे वाटायचे. तुला तुझ्या गावाची ओढ होती. सणासुधीला तु कायम गावाला जात होतास. तुझ्या बैलाच्या जोडीचे,शेतात काम करतानाचे व नदीत पोहतानाचे फोटो शेअर करीत होतास. तुला समाजकार्याचीही  मोठी आवड होती. शाळा सुरु झाल्या की सुट्टी टाकून शाळेतील मुलांना पुस्तके, वह्या व शाळेत जाण्यास लागणारे साहित्य मुंबईहून टेपोने नेऊन कोकणातील शंभरएक शाळेतून मोफत वाटत होतास.   


करोना काळात तु आम्हाला सोडून गेलास पण आम्हाला तुझे अंतिम दर्शन घेता आले नाही. याचे दु:ख झाले. त्यावेळी तुझ्यासोबत केलेल्या ट्रेकमधील फोटो पाहत राहिलो. खूप वाईट वाटले. करोना संपल्यानंतर आम्ही सर्व मित्रांनी तुझ्या दोन्ही मुलांसह तुला श्रध्दांजली वाहण्यास एक गडावर गेलो होतो. त्यावेळी तुझी सर्वांनी आठवण काढली. तुझ्यासोबत केलेले सर्व ट्रेक डोळ्यासमोर येत होते. तु गायलेली गाणी अजून कानावर येत असतात. तुझ्या कुटुंबाची आम्ही नियमित चौकशी करून माहिती घेत असतो. 


तु आम्हाला मध्येच सोडून गेलास पण तुझ्या आठवणी पुसल्या जाणार नाहीत.  ट्रेकमध्ये तु आमच्या सोबत आहेस असा भास होत राहतो. ट्रेकमध्ये इतरांना आपण कोठे आहोत याची माहीती देण्यासाठी एक विशिष्ठ आवाज काढत होतास. त्या आवाजाला व तुला आम्ही कधीच विसणार नाही.


तुझा मित्र

विवेक तवटे


Thursday, July 28, 2022

चित्त तिचं पिल्लापाशी

मित्राने त्याच्या मुलाच्या लग्नाचे आंमत्रण दिले. लग्न नागपुरात असून जुन महिन्यात होते. लग्नापूर्वी ताडोबा जंगलात सफारी करण्याची आम्ही मित्रांनी ठरवले. उन्हाचा त्रास होणार आहे. पण या काळात वाघांचे दर्शन होते अशी जाणकारांकडून माहिती मिळाली. लगेच जाण्याचे नक्की करून तिकीटे बुक केली. 


नागपुरात पोहचलो.उन्हाचा कडाका होता.पण धाम येत नव्हता. खाण्याच्या पदार्थात तिखटाचा जाळ होता. आम्ही दहीभातावरच दिवस काढले.पहिल्या दिवशी आम्ही नागपूर पासून ८० किलोमीटर असलेल्या ’उर्मेड’  या अभयारण्यात दुपारी ओपन जीपमधून सफारीला सुरुवात केली. सुकलेल्या व जळलेल्या रानातून जीप जात होती. लांबवर हरणे व नीलगाय दिसले. पक्षी उडताना दिसले.काही झाडांना नवी पालवी फुटलेली दिसली.रानडुकरांचा कळप पाहिला.पण वाघ काही दिसला नाही. उन्हाने हैराण झालो होतो. वाघाच्या नियमित येण्याच्या ठिकाणावर जाऊन आलो.जीप गाड्या इकडून तिकडे घावत होत्या. संघ्याकाळ झाल्यावर जंगलातून हताश होऊन बाहेर आलो.सगळे नाराज झाले होते.


दुस-या दिवशी ताडोबाला निघालो.गेटवर जाऊन नोंदणी करुन दुपारच्या उन्हात जंगलात शिरलो. कॅमेरे जवळ घेतले होते. ’उर्मेड’  पेक्षा ’ताडोबा’ चे जंगल मोठे असून दाट आहे. ’ताडोबा’ मघ्ये कोअर व बफर असे दोन झोन आहेत. दोन्ही झोनची वेगवेगळी फी आहे.  वाघ कोणत्याही झोन दिसू शकतो. गवे,हरणे व रानडुक्कर दिसते होते. मोर व लांडोर दिसले. पाण्याच्या ठिकाणांवर जाऊन थांबलो. वाघाची वाट पाहिली. फक्त पक्षी पाहिले. उन्हाने करपलो होतो. जीपचे चालक व गाईड फोनवरून कोठे तरी वाघ दिसल्याची माहिती घेत होते. संपूर्ण जंगल पालथे घातले. आजपण वाघचे दर्शन होणार नाही असे वाटले.आम्ही नाराज झालो होतो.



इतक्यात गाईडचा फोन वाजला. त्याच्या भाषेत संभाषण झाले. चालकानी गाडी वेगाने वळवली आणि पळवली. वाघ झाडीतून बाहेर आलेल्याची खबर मिळाली होती. जीप चालकाने जीप योग्य ठिकाणी उभी केली. डावीकडच्या झाडीतून वाघ बाहेर पडला आहे,असे गाईडने आम्हाला सांगितले.आमच्या मागे आणखी दोन जीप उभ्या राहिल्या. थोड्याच वेळात  जंगलातून ’घरणी’ नावाची वाघीण आमच्या दिशेत येताना दिसली.आम्ही सर्वजण वाघ दिसला म्हणून खूष झालो.वाघीणीने झाडीतून रस्ता काढत आमच्या जीपच्या समोरून रस्ता ओलांडून उजवीकडच्या झाडीत घुसली. आपल्याच तो-यात चालली होती.तिला कसलेच भय वाटत नव्हते पण आम्हाला गाडीत असूनही भिती वाटत होती. जंगलातील मुक्त वाघीणीच्या दर्शनाने आंनद झाला.


ती वाघीण तिच्या पिल्लाला भेटण्यास निघाली आहे,गाईडने आम्हाला सांगितले व चालकानी गाडी सुरु करून निघाला.वाघीणीचा पिल्लू कोठे आहे चालकाला व गाईडला  माहित असल्याने त्याच दिशेने जीप घावू लागली. चालकाने एका पाणवठ्यावर जीप आणून  बंद केली.ताडबतोब दहा ते पंधरा जीप आमच्या मागे येऊन उभ्या राहिल्या.गाइडने सर्वांना शांत राहण्यास सांगितले. आम्ही वाघीणीची वाट पाहत होतो.कॅमेरे तयार ठेवले होते.संध्याकाळ होत होती.



लांबवर झाडीत हालचाल दिसली आणि वाघीणीची चाहूल लागली. वाघीण  झाडीतून बाहेर येऊन उघड्यावर माळरानावर आली होती. वाघीण जंगलाच्या राणीच्या अविर्भावात ऐटीत चालत येताना दिसली. काय तिचा रुबाब होता. चालण्यात एक लकब होती. आपल्या वनक्षेत्राची ‘सम्राज्ञी’ चालत निघाली होती. आम्ही तिची ती चाल पाहत राहोली व तिचे फोटो काढत होतो. लांबून दिसणारी ती वाघीण आता जवळ जवळ येत होती. अर्धी चिखळाने माखलेली होती. उन्हाला जास्त असल्याने गार पाण्यात खूप वेळ बसून बाहेर पडली होती. 



आता ती पाणवठ्याच्या दिशेने निघाली होती. आमच्या समोरून ती पुढे सरकली होती. मध्येच दोन झाडांच्या बुंध्या जवळ रेगांळली व तेथे वास घेऊन पुढे निघाली. आम्ही तिची हालचालीवर नजर ठेवून होतो.पाणवठ्याला वळसा घालताना ती दिसत नव्हती. पाणवठ्याच्या बांधावरून वर आल्यावर पुन्हा दिसू लागली.ती पुढे झाडीच्या दिशेने पुढे जात होती.तीने कसला तरी आवाज केल्यावर त्या झाडीतून तिचा बछडा दुडुदुडु करीत बाहेर आला. दोघेही एकमेकांच्या दिशेने पुढे जात होते.बछडा तिच्याजवळ आला आणि तिच्या पायात गोल फिरू लागला.तिच्या अंगावर उड्या मारू लागला. ती त्याला चाटू लागली. त्या दोघांची ती भेट पाहत राहवीशी वाटत होती.ती भेट पाहून भरून आले.आई व मुलाचे एकमेकावरचे प्रेम तेथे दिसत होते. त्यांना बोलता येत नसले तरीही कृती ते प्रेम व्यक्त करत होते. वाघीणीने बछड्याला खेळ खेळवत व गोंजारत त्याला पाणवठ्याच्या जागेतून बाहेर काढले व दोघे निघाले व झाडीत घुसले. तेथील सर्व प्रकार पाहून आम्ही थक्क झालो. आपण काय पाहिले ते खूपच चांगले पाहिले.     







ही वाघीण चार ते पाच दिवसांनी या बछड्याला भेटली असल्याचे गाईडने आम्हाला माहिती दिली.हा बछडा त्या झाडीतच बसून तिची वाट पाहत होता. या बछड्याच्या भावडांना तेथील वाघाने मारले असल्याने वाघीणीने या बछड्याला वाघापासून लांब सुरक्षित ठिकाणी लपवले होते. तेव्हा ती त्याला भेटायला आली होती. ही गोष्ट कळल्यावर ह्या वाघीणीची व तिच्या बछःड्याची झालेल्या भेटीचे महत्व अधिक वाढले.आम्ही आवाक झालो. त्या बछःड्याशिवाय वाघीणीने एवढे दिवस कसे बाहेर काढले असतील? आणि आई शिवाय बछडा कसा जगला असेल? एकमेकांच्या आठवणीवर हे दोघे कसे जगले असतील का? हे निर्सगातले कोडेच आहे.




पुन्हा जीप चालकांने सर्व जीपच्या गर्दीतून आमची जीप बाहेर काढत वाघाणीच्या मागावर निघाले. एका ठिकाणी जाऊन थांबले.पण यावेळी आमच्या पुढे काही जीप उभ्या राहिल्या होत्या. त्यांना अंदाज होता वाघीण व तिचा बछडा या रस्त्याने येतील.अंधार पडत चालला होता.आम्ही त्या दोघांची वाट पाहत होतो.थोड्यात वेळात ती दोघं आम्हाला लांबून येताना दिसली.बछडा वाघीणीच्या पायात सारखा येत होता. त्या दोघांनी आमच्या समोरुन रस्त्या ओलांडला. जीप गाड्या पुढे जाण्यास सुरुवात झाली. बछडा तिच्या पासून थोडा मागे रेंगाळला. दोघांमध्ये थोडे अंतर पडले होते.ती तिच्यात तो-यात चालत होती.एक जीप तिच्या पुढे गेल्यावर तीने त्या जीपवर एक कटाक्ष टाकला.वाघीणीच्या एका नजरेने सर्व धाबरले होते.ती तेथेच थबकली.मागे पाहिले.तिला तिचा बछडा लांबवर दिसला.वाघीणीने त्याच्याकडे पाहिल्या बरोबर बछडा पळतपळत वाघीणी जवळ आला. त्याला पुढे झाडीत घुसवून वाघीण नंतर झाडीत घुसली. आता ती नजरेआड झाली होती. सर्व शांत झाले. 




वाघीणीचा वीस ते पंचवीस मिनिटांचा तो प्रवास आम्ही जवळून पाहिला. वाघ दिसला नाही म्ह्णून नाराज झालेले आम्ही भारावून गेलो.त्या दोघांची ती भेट आम्ही कधीच विसरू शकणार नाही.आताही ती दोघं नजरेसमोर दिसत आहे. आई व तिच्या मुलाचं नातं निव्वळ वात्सल्याचं असतं. 

   





Wednesday, July 6, 2022

आम्ही ट्रेकर्स!

'आम्ही ट्रेकर्स!’ हा लेख महाराष्ट्र टाईम्स या वृतपत्रातील ’कट्टा आमचा हक्काचा’ या सदरात दि. ०६ जुलै २०२२ रोजी प्रसिध्द झाला आहे. 






मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबचा ट्रेकिंग या साहसी खेळाचा एक ग्रुप आहे. गेली तीस वर्षात या ट्रेकिंग ग्रुपने  सह्याद्री व हिमालयात मोहिमा आखून यशस्वी केल्या आहेत. प्रत्येक ट्रेकला मोठ्या संख्येने ट्रेकर सहभागी होतात. लहान मुलं, महिला व सेवानिवृत कर्मचारी देखील ट्रेकमध्ये कायम सामील होतात. सर्वांना निसर्गात नेऊन इतिहासाची ओळख करीत सुरक्षित ट्रेक करणे हा ग्रुपचा मुख्य हेतू असतो.तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टचा १५० वा वर्धापन दिन....२६ जून १८७३ रोजी असल्याने विश्वविख्यात संस्थेचा स्थापना दिवस. खास या दिनाचे औचित्य साधून मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लब ने आयोजित केलेला ही मोहिम पूर्ण करुन हा स्थापना दिन साजरा केला.

गेल्या दोन ते अडीच वर्षात करोनामुळे एकाही ट्रेकमध्ये कोणालाच सहभागी होता आले नव्हते. या वर्षी पावसाळा सुरु झाल्याबरोबर सर्वांनी ट्रेकला जाण्याची तयारी सुरु केली. यंदा सर्व मित्रांना भेटण्याची संधी गमवायची नव्हती. सर्व मित्रमंडळींना ब-यास दिवसांनंतर प्रत्यक्ष भेटण्याची आस लागली होती. शहापूर जवळील "आजोबा" पर्वतावरील "सितामाईचा पाळणा ट्रेक" करण्याचा बेत आखला गेला. ट्रेक मोठा न ठेवता सर्वांना एकत्र भेटता यावे म्ह्णून हा ट्रेक ठरवला. सोशल मिडियाच्या मदतीने सर्व ट्रेकर्स माहिती देण्यात आली. कधी एकदा सह्याद्रीत जाऊन मित्रांना भेटतो असे झाले होते.उत्साह खूप वाढला होता.

कसारा लोकलमध्ये सर्व ट्रेकर्स ठरलेल्या डब्यात चढत होते. एकामेकांना मिठ्या मारत होते. ते पाहून आंनद झाला. सर्वांनी मित्रांसाठी आपल्या सॅक भरून खाऊ आणला होता. आसनगाव - शहापूर आणि पुढे जीपने प्रवास करीत वाल्मीकी आश्रमात पोहचलो. सर्वांनी एकमेकांची खुशाली घेतली व नव्याने  सामील  झालेल्यांची ओळख करून घेतली. विविध वयोगटातील जेष्ठ व नव्याने सामील झालेल्या सुमारे पन्नास ट्रेकर्संनी या ट्रेकला हजेरी लावली. 

आश्रमाचा जवळचा परिसर रम्य आहे. या ठिकाणी वाल्मिकी ऋषींचे मंदिर, कालभैरव , शंकर मंदिर आणि काही वीरगळ व समाधी शिळा पाहिल्या. या आश्रमा मागून धबधब्याच्या वाटेने चढण्यास सुरुवात केली. घनदाट  जंगल असल्याने वर चढताना उन्हाचा त्रास झाला नाही. पाऊस नसल्याने खूपच गरम झाले. तासा दिड तासात आम्ही खिंडीत पोहोचलो. येथे डाव्या बाजूला वर एक गुहा आहे. तेथे जाण्यासाठी १५ फ़ूटाचा छोटा रॉक पॅच आहे. येथे सध्या लोखंडी शिडी बसवल्याने गुहेपर्यत पोहचणे सुरक्षित झाले आहे. शिडीवरुन गुहेत चढून गेल्यावर खडकात कोरलेल्या लवकुशाच्या पादुका दिसतात. तेथेच लव कुशांचा पाळणा लावलेला आहे. आजची रात्र येथेच गुन्हेत राहावे असे सर्व ट्रेकर्स वाटत होते.

थोड्यावेळाने खिंड धुक्यात गेली. जोरात गार वारे वाहू लागल्याने चढतान आलेला थकवा दूर झाला.फोटोग्राफी झाली गाणी झाली. तथेच पोटपुजा करून खाली उतरू लागलो. उतरताना पावसाचा अभिषेक सुरु झाल्याने भिजण्याचा आंनद घेता आला. मोठा पाऊस झाला नसल्याने खाली वाटेत असलेल्या धबधब्याला पाणी नव्हते. ट्रेकचा थकवा दूर करता न आल्याने त्या आंनदापासून दूरावलो.    

ह्या ट्रेकचा सर्वांनी मनसोक्त आनंद लुटल्याने हा ट्रेक सर्वांच्या आठवणीत राहील. पुढच्या ट्रेकची आखणी करत घरचा प्रवास सुरु केला.